रेषा

छोटी, मोठी..
जाड, बारीक……..
सरळ, वक्र…..
सुबक, बोथड……
उभी, आडवी, तिरपी….
मर्यादित, अमर्यादित संधर्भ देणारी….
बोलती झालेली, कथा सांगणारी…..
रडवणारी, हसवणारी….
कधी कधी,
गंभीर होऊन
अंतर्मुख करणारी….
संगीत ऐकविणारी….
अभिनय करणारी ….
गाणारी, गुणगुणनारी…..
मधुर स्वरांबरोबर
कधी ढोल वाजवणारी…..
निर्मितीक्षम जगलेली “रेषा”
मृत झाली, अप्रवाही झाली, अबोल झाली….
थांबली…..
मरिओच्या जाण्याने.
Advertisements

शब्दचित्र 3

शब्दचित्र 3


शब्दचित्र वाचल्यानंतर अनेकांनी मेसेज द्वारे तर काहींनी फोन करून मला प्रतिक्रिया दिल्या…
त्यातील काहींनी हा प्रश्न विचारला कि तुम्ही या माध्यमातून चित्र काढायला कसे शिकवाल?
तर चला हा देखील प्रयोग करून पाहूया…

आजच सरळ रेषा काढून आपल्या चित्रकलेचा श्री गणेशा करूयात . मी माझ्या परवाच्या शब्दचित्र मध्ये जो काही अनुभव सांगितला तो तुम्हीहि करून बघा.
समोर पेपर, पेन्सिल अथवा पेन घ्या . आणि डोळे मिटून शांत बसा…
मग ४-५ वेळा दीर्घ श्वास घ्या…
तसेच डोळे मिटून शांत बसा…
आपल्या आसपासच्या आवाजावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा…
नंतर हळू आणखी सूक्ष्म आवाज ऐकायला येतील….
आणि अशाच रोजच्या सततच्या सरावाने तुम्हाला तुमच्या स्वतः च्या हर्टबिट्स हि ऐकायला येतील.

मग आपल्या दोन्ही हातांना जवळ घेऊन हळुवार स्पर्श करा…
त्या हळुवार स्पर्शातून तुम्ही आपल्या हाताशी चैतन्यदायी शक्तीचा अनुभव कराल…
डोळे मिटलेल्या अवस्थेत हा अनुभव घेतांना आपल्या हातांनाही धन्यवाद द्या..
आपण एवढे काम या हातांच्या माध्यमातून करतो परंतु आपल्या हातांना आपण कधीच ‘थॅंक्स’ म्हणत नाही, त्यावर कधीही प्रेम करीत नाही. (तर हा प्रयोग तुम्ही नेहमी तेव्हा करा.) आणि, मग बघा त्या हातांच्या माध्यमातून केलेले काम काही वेगळेच होईल.

आता समोर ठेवलेल्या पेपरलाही असाच स्पर्श करा…
आणि मग पेन्सिल पेन जे काही आपल्या जवळ असेल त्यालाही तसेच तयार करा..

आता पेन्सिल घेऊन कागदावर आडवी रेषा काढायला घ्या.
तत्पूर्वी परत श्वास घ्या आणि सोडतांना समोरच्या पेपरवर आडवी रेषा काढा.

आता तीच रेषा मागून पुढे उलट्या दिशेने काढा हे करतांना श्वास घ्या. परत श्वास सोडतांना आडवी रेषा काढा.

अशीच रेषा पेपरवर वरून खालपर्यंत काढा

 

आणि परत खालून वर उभी…

आडव्या उभ्या असंख्य रेषा काढा. त्याचा रियाझ करा. मी रियाझ यासाठी म्हणालो कारण या रेषाच चित्र-कलेतील ‘स्वर’ आहेत असे मला वाटते.
जसे संगीत शिकतांना स्वर पक्के करण्यासाठी रियाज करावा लागतो. आणि एकदा पक्के झाले कि पुढच संगीत शिकणे सोपे होते तसाच चित्राचं आहे. या स्वररूपी रेषाच आपला पुढील चित्र निर्मितीचा प्रवास अधिक आनंददायी करतील….
आता या रेषांच्या आणखी माहितीसाठी उद्या भेटूयात ..

शब्दचित्र.2

प्रिय मित्रांनो ,
कालच्या पहिल्याच शब्दचित्राला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद…
अश्मयुगापासून आदिमानवाने सुरु केलेला हा कला निर्मितीचा प्रवास आज संगणक युगातील अँनिमेशन निर्मितीपर्यंत येऊन पोहोचला आहे.
या प्रवासात अनेक स्थित्यंतरे झाली, जगभरातल्या असंख्य कलावंतांनी आपल्या कालासाधानेतून अजरामर अशा कलाकृती निर्माण केल्या आहेत.त्या प्रत्येक निर्मितेमागे त्या वेळेची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती आणि त्या कलावंतांच्या मनावर होणारा त्याचा परिणाम हा त्या त्या कलाकृती बघतांना प्रतिबिम्बित होताना आपल्याला दिसतो. या बाबत सविस्तर असा संवाद आपण यापुढे साधणारच आहोत. पण मला या सर्वांमध्ये एक गोष्ट कॉमन अन अत्यंत महत्वाची वाटते. ती म्हणजे त्या कलावंतांचे मन आणि हात.
प्रत्येक कलावंत ज्या संवेदनशील अवस्थेत तितक्याच संवेदनशील हातांच्या सहाय्याने एखादी कलाकृती साकार करतो. ती कलाकृती मग त्याचीच न राहता सर्व समाजाची होऊन जाते.
अलता-मीरा आणि भीमबेटका गुहेतील आदिमानवाने काही लाख वर्षांपूर्वी काढलेल्या मानवाच्या त्या पहिल्या अविष्कारापासून चित्रनिर्मितीची रेषा हि मला अत्यंत महत्वाची वाटते. कारण ह्या रेशामधुनच आजपर्यंतची कला विश्वाची व्याप्ती साकारलेली दिसते. ह्या रेषां बद्दलच सविस्तर माहिती आपल्या पुढच्या भागात…………………………………………….

“शब्दचित्र”

“शब्दचित्र”

प्रिय मित्रांनो,

११/११/११ चा संयोग साधून एका नव्या शब्द चित्राद्वारे रसिकांसोबत संवाद साधण्याची सुरुवात आज मी करीत आहे. मी याला ‘शब्दचित्र’ यासाठी संबोधितो कारण शब्द ज्या रेषा मधून तयार होतात ती रेषा तर चित्रांचीच आहे. ब्लॉग लिहिण्यासाठी भावना शब्दबद्ध करायला मी जेव्हा कागद समोर घेतला, तेव्हा नकळत सवयीप्रमाणे त्यावर हळुवारप्रमाणे स्पर्श करून कागदाला आधी तयार केले. की मी लिहायला आता तयार आहे, तू पण तयार हो. जसे मी चित्र काढतांना आधी करतो. कागद, कॅनव्हास अथवा चित्रनिर्मितीचा कोणताही पृष्ठभाग समोर आला की मी त्यावर आधी हळुवारपणे स्पर्श करतो… आणि सांगतो कि ‘मी तुझा वापर करून काही निर्माण करण्यास तयार आहे तू पण तयार हो आणि मला या चित्र निर्मितीत साथ दे’. तसेच पेन्सिल, पेन, रंग, ब्रश, अन् शिल्प साकारताना मातीशी देखील हाच संवाद होतो. कारण त्यांच्या संयोगाने, ही माध्यम देखील जिवंत आहेत हे समजून घेतल्याने साकारलेली प्रत्येक कलाकृती, मग त्या कागदावरील मोजक्याच रेषा असोत, अथवा एखादे शिल्प असो ते लोकांना जिवंत वाटत. त्यात ह्या माध्यमांचा देखील तितकाच महत्वाचा वाटा आहे अस मला वाटत. निर्मितीच्या सुरुवातीला केलेल्या ह्या स्पर्शाने ही माध्यमही जागी होतात. म्हणूनच माझी प्रत्येक कलाकृती रसिकांना जिवंत वाटते. त्यामागच गुपित हेच आहे.

आता अशा अनेक विचारांसोबत एक कलाकार आणि एक सामान्य माणूस म्हणून कलेविषयक माहिती, काही अनुभव, भेटलेल्या मान्यवरांचे विचार तुमच्या सोबत शेअर करणार आहे.

भेटत राहूच…

आपला,

प्रमोद कांबळे.